निसर्गातील विविध भाव भावनांचा अंतर्भाव असलेला सृजनशील अविष्कार म्हणजे कला होय. म्हणजेच या भावना व्यक्त होण्याचं माध्यम म्हणजे कला. आणि असा अविष्कार जो निर्माण करतो,तो ‘कलाकार’. असं म्हणतात की कलाकार हा जन्माला यावा लागतो. जन्माला आल्यानंतर त्याला कलेचं शास्त्र शिकावं लागतं, त्याचं तंत्र अवगत आणि विकसित करावं लागतं, विद्या मिळवावी लागते आणि आपली ही कला संस्कारीत करावी लागते. त्यासाठी त्यास एक उत्तम गुरू आवश्यक असतो. परंतु , कला उपजत असलेले सर्वच जण काही त्या-त्या कलांचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतातच असे नाही. काहीजण केवळ हौस किंवा एक छंद म्हणून कलेकडे बघतात. तर काहीजण कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन व्यवसायाचे साधन बनवतात,तर काहीजण व्यवसाया बरोबरच आपले आयुष्य हे कलेच्या सेवेसाठी अर्पण करतात.
कलेचे शिक्षण घेतल्यास कला ही अधिक प्रभावी होण्यास मदत तर होतेच पण त्याचबरोबर,सृजनशीलता वृद्धिंगत होण्यास वाव निर्माण होतो.
त्यामुळे कलेचे शिक्षण घेताना,आपले शिक्षण घेण्याचे उद्दिष्ट तसेच ध्येय काय?,याबाबत साधकाने जागरूक राहायला हवे. तर कलेचे तंत्र,शास्त्र व त्याची विद्या मिळवणं ही प्रामुख्याने उद्दिष्ट्ये असायला हवीत. आणि ही उद्दिष्टपूर्ती झाली की मग ध्येयाचा प्रवास सुरु होतो. म्हणजे उद्दिष्टांच्या आधी ध्येय नसते असेही नाही, ते असू ही शकते. पण उत्तम शिक्षणाने ध्येय आणि त्याच्या पूर्तीचा प्रवास जास्त चांगला आणि संस्कारीत होतो.
उद्दिष्टं आणि ध्येय या दोहोंमध्ये बऱ्याच बाबी सारख्या आहेत. या दोहोंच्या प्राप्तीसाठी मनापासून आवड हवी,मेहनतीची तयारी हवी,समर्पण हवे,कलेवर व गुरूंवर श्रद्धेबरोबर निष्ठा पण हवी. आणि बऱ्याच वेळा,आपलं उद्दिष्ट/ध्येय साध्य झालं आहे,असं वाटत नाही. तर हे पुर्ण करण्यासाठी अजून थोडासा वाव आहे,असा भाव कायम असतो.मात्र एक या दोहोंमध्ये मला फरक फार महत्वाचा वाटतो. तो म्हणजे, उद्दिष्टे हे सुखाची अनुभूती देतात तर ध्येय समाधान देते.
विद्यार्थी अवस्थेत असताना चांगली साधना करून आपली बहुतांश उद्दिष्टे पूर्ण करून घ्यायला हवी. याच काळामध्ये आपला आपल्या कलेशी एक ऋणानुबंध तयार होतो. आपली या कलेकडे बघण्याची स्वतःची एक नजर बनते,एक दृष्टिकोन तयार होतो. कलेतील परिपक्वता वाढत जाऊन नकळत एक ध्येय कलावंताला प्राप्त होते. त्याच्या आयुष्यातील हा फार महत्वाचा टप्पा असतो. बुद्धी च्या आज्ञेनुसार होणारी साधना ही मनाच्या मागणी स्तव होणाऱ्या उपासनेत कधी परावर्तित होते,हे त्याला सुद्धा कळत नाही. कलेचा आस्वाद प्रथम स्वतः घेऊन तोच भाव समोरील रसिकांच्या मनापर्यंत,हेच अमूर्त ध्येय उराशी बाळगुन कलाकाराचा सृजनशील प्रवास त्याच्याबरोबरच संपतो. प्रवास संपतो…….परंतु हा प्रवास अनेक साधकांना ध्येयवेडा बनवत त्यांना मार्ग दाखवत असतो.
