मैत्री म्हणजे अनेक भाव भावनांना सामावुन घेणारं आणि मर्यादेत राहूनही स्वातंत्र्य देणारं खट्याळ परंतु प्रगल्भ असलेलं एक स्वतंत्र नातं..!
कुठल्याही आदर्श नात्याबद्दल मला कायम असं वाटत आलंय की, ज्या बंधनात स्वातंत्र्याचं अस्तित्व जाणवतं, ते बंधन खऱ्या अर्थानं ‘नातं’ असतं. तर ज्या नात्यात स्वातंत्र्याची उणीव भासते, ते नातं सुद्धा ‘बंधन’ वाटत राहतं.
एखाद्या नात्यात ‘मैत्री’ असणं आणि त्या नात्यात ‘मैत्रीपूर्ण व्यवहार’ असणं, ह्या दोन भिन्न बाबी आहेत.
आता तुम्हांला वाटेल की हा गाण्यातला माणूस हे भलतंच काय बोलायला लागला. पण मी गाणं शिकवताना विद्यार्थ्यांना म्हणत असतो की ‘जोपर्यंत स्वरांशी मैत्री होणार नाही, तोपर्यंत गाणं येणार नाही’. म्हणजे मनात स्वर आला की तो चटकन लावता यायला हवा,तर मैत्री पक्की.
आणि एकदा का सर्व स्वरांशी घट्ट मैत्री झाली की पुढे राग म्हणजे नुसते खेळ आहेत. काही खेळ एक दोघांना नाही आवडत तर ती मंडळी बाहेर थांबतात. काही खेळ सर्वांना आवडतात तर त्या खेळात सगळेच सामील होतात. आणि हे स्वर म्हणजे केवळ शास्त्रीय संगीताच्या मालकीचे आहेत असंही नाही. ते भावगीत,नाट्यगीत,अभंग,गझल इ. खेळातून सुदधा बागडताना दिसतात.
मैत्रीचं नातं प्रगल्भ किंवा सुंदर असण्यात दोन घटक मला फार महत्वाचे वाटतात. एक म्हणजे संवाद(communication) आणि दुसरा म्हणजे सोबत(along)……..स्वरांमध्ये संवाद साधल्याशिवाय राग साधता येत नाही. एकमेकांच्या साथीनं प्रत्येक स्वराला बोलतं करायला लागतं. म्हणजे सगळेच एक सारखे बोलतात असं नाही. हे जाणून घेणं सुद्धा फार महत्त्वाचं असतं…एखादा ‘वादी’ फार बोलतो तर एखादा ‘संवादी’ जरा कमी,एखादा ‘विवादी’ वाद घालणारा असतो तर काही ‘अनुवादी’ तटस्थ असतात. मात्र आपला सर्वांशी उत्तम संवाद असेल, तर तो संवाद साधता साधता जी सोबत निर्माण होते, त्यातून एक सुरेल आणि सुंदर राग नक्की साधला जाऊ शकतो.
गाण्यात संवाद म्हणजे ‘विचार'(Thought) तर सोबत म्हणजे ‘साधना’ (रियाज/practice). ‘मैत्री’ आणि ‘मैत्रीपूर्ण व्यवहार’ ही बाब स्पष्ट करताना मला असं सांगावसं वाटतं की जे विद्यार्थी रियाजाला फार महत्व न देता केवळ क्लास ला हजर राहण्याला प्राधान्य देतात त्यांची गाण्याशी मैत्री नसून तो केवळ एक मैत्रीपूर्ण व्यवहार असतो.
संगीतात विचारांच्या साधनेला च महत्व दिलं गेलं आहे. साधनेत विचार नसेल तर ती साधना दर्जाहीन ठरते. साधना साधकाला परिपूर्ण (perfect) बनवू शकते, पण विचार हा त्या साधकाला समृद्ध बनवतो.
म्हणजे बघा की एकाच घरात सोबत राहणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये संवाद नसेल तर ते नातं कसं वाटेल आपल्याला?!
विचार आणि साधना यांच्यात कोण आधी? तर असं काही नाही.
‘आपल्याला चांगलं गाता यावं’, अशा सामान्य विचारातून उत्तम साधनेची सुरुवात होऊ शकते तर कधी केवळ गुरूंच्या आदेशानुसार होणाऱ्या प्राथमिक व साधारण साधनेच्या कृतीतून असाधारण विचार जन्माला येतात. म्हणजे संवाद आणि साधना या एकाच नाण्याच्या दोन बाजू. असंच नाणं चलनात येतं.
स्वरांशी मैत्री झाली की त्यांचे इतर पैलू समोर येतात. मला ना हे स्वर म्हणजे अभिनेत्या सारखे वाटतात. म्हणजे रागानुसार त्यांचा role बदलतो आणि रूप सुद्धा.. मारव्या मधला व्याकुळ कोमल रिषभ श्री मध्ये जरा ताठ कण्याचा वाटतो तर भैरव मध्ये तो प्रासादिक वाटू लागतो. यासारखे प्रत्येक स्वरांचे बारकावे समजून घेण्यासाठी प्रथम त्या स्वरांना नीट समजून घेतले पाहिजे.जेणेकरुन त्या त्या रागातील स्वरांचे व्यक्तिमत्त्व आपल्याला समजेल.
स्वरांना व्यक्तिमत्त्व जरी असलं, तरी ते प्रत्यक्षात व्यक्ती नाही. स्वरांना माणसा सारखा व्यवहार जमत नाही. त्यामुळे व्यक्ती म्हणून तुम्ही प्रामाणिक असाल तर हे स्वर मैत्रीत कधीच दगा करणार नाहीत. म्हणजे तुम्ही रियाजात नसाल तर स्वर मनासारखे लागणार नाहीत , हे जरी खरं असलं तरी कुण्या दुसऱ्या व्यक्तीच्या गळ्यातून किंवा वाद्यातून निघालेले सच्चे स्वर तुमच्या नकळत तुमच्या काळजाचा ठाव घेऊन तुम्हाला सुखावून जातात. असे निगर्वी मित्र आणि त्यांची मैत्री कुणाला नको असेल?