राग, शब्द, ठेका (ठरवून ताला ऐवजी हा शब्द वापरला आहे) आणि लय हे बंदीशीचे मुख्य घटक आहेत. बंदिशी मध्ये रागाचे नियम व सौंदर्य हे खुलून यायला हवे. शब्द हे साधे, सरळ ,नादयुक्त आणि उच्यारणाला सोपे असावे. आणि बंदिश गायला सुरू केल्यास लय व ठेका आपसूक च त्यात दिसून यावा. अशी बंदिश मला आदर्श वाटते.
आता ‘लय’ या घटकाविषयी.
बंदिशीला स्वतःची एक लय असते. चुकीच्या लयीत गायलेली बंदिश परिणाम कारक ठरत नाही.
विलंबित लयीमध्ये बंदिश गाताना लयीचा छंद होणं अपेक्षित असतं आणि जेव्हा ती मध्य किंवा द्रुत लयीत गायली जाते तेव्हा लयी सोबतच ठेक्याचा छंद होणं सुद्धा अपेक्षित असतं.
आणि राग व लय या दृष्टिकोनातून बंदीशीकडे बघताना, बंदिश कोणत्याही लयीत गाताना, ती रागाची धून होऊन मनावर सतत रुंजी घालणारी हवी.
बंदीशीने गायनाला काय दिलं?
राग उलगडण्याचं माध्यम म्हणजे बंदिश.
रागाची मांडणी कशी करायची आहे,याचा विचार करताना सर्वप्रथम बंदीशीचा संदर्भ लक्षात घ्यायला लागतो. म्हणजे अमुक एखादा राग 40 मिनिटं मांडायचा आहे तर त्याला पूरक अशाच विलंबित ख्याल आणि द्रुत ख्यालाचा संदर्भ आधी ध्यानात घ्यावा लागेल. म्हणून जशी बंदीशीची धाटणी बदलेल तसं रागाचं स्वरूप आणि त्याची लवचिकता सुद्धा बदलते. बंदीशीचा मुखडा हा राग उलगडण्याच्या क्रियेत सर्वात महत्वाचा घटक ठरतो. कारण प्रत्येक आलापाची सुरुवात आणि शेवट याला संदर्भ हा मुखड्याचा असतो/असायला पाहिजे. या संदर्भाने केलेले सादरीकरण हे रागाच्या सौंदर्य भर पाडत असते.
एकाच रागातील एका ख्यालाची सम पूर्वांगात आणि दुसऱ्या ख्यालाची सम उत्तरांगात असेल तर तोच राग आपल्याला वेगळा प्रतीत होतो. वेगवेगळ्या धाटणीच्या बंदीशींमुळे रागाचा स्वाद पण निराळा होतो,आणि वेगळी अनुभूती त्यातून मिळते. यामुळे कलाकाराच्या सृजनशीलतेला वाव तर मिळतोच पण एकाच रागातील अनेक बंदीशींमुळे त्याची सांगीतिक श्रीमंती पण वाढते.
रागातील तोच ख्याल आपण जेव्हा पुन्हा पुन्हा गातो तेव्हा रागात अनेक नवनवीन वाटा आपल्याला सापडायला लागतात,याचं रागा एवढंच श्रेय बंदिशीला जातं, असं मला वाटतं. अशा बंदिशी कलाकारांना जास्त भावतात व परिणामतः रसिकांना सुद्धा.
कलाकार त्याला सुयोग्य वाटेल अशा बंदीशीची निवड करून राग रसिक मनापर्यंत पोहोचवतो. उदाहरण दाखल ‘कौन गत भई’,’आज राधे तोरे’,’सुघर बर पायो’,’एरी आली पियाबीन’,’तिरथको सब फिरे’ इत्यादी बंदिशी अनुक्रमे बागेश्री,रामकली,जोगकंस, यमन,तिलक कामोद या रागांचे प्रतिनिधित्व करतात. बंदिशी वरून रागाची ओळख होणे,यावरून आपल्याला लक्षात येईल की बंदिश किती महत्वाची ठरते.
रागांना अनेक वर्षांची परंपरा आहे. नवनव्या बंदीशींची भर या रागांमध्ये पडते आहे. यावरून हे लक्षात येते की रागाची व्याप्ती किती प्रचंड आहे. परंतु मूळ रागस्वरूप दाखवण्यासाठी थोडा वेळ पुरेसा आहे. पण तो अधिक उलगडण्यासाठी तसेच त्याची व्याप्ती आणि सौंदर्य खुलवण्यासाठी बंदिश मोलाचे कार्य करत असते. तर, बंदीशीने गायनाला किंवा संगीताला काय दिलं, असा विचार करताना, बंदीशींनी रागाचे सौंदर्य व त्याची व्याप्ती सिद्ध केली आहे, असे म्हणता येईल.