परीक्षा

 

अगदी शालेय जीवनातच जिच्याशी परिचय होतो आणि तेव्हा पासून च आयुष्यात नको असलेली पण जी आयुष्यभर कायम सोबत असते, ती म्हणजे परीक्षा. ती कधी आणि कशी आयुष्यात येते आणि त्याचा अविभाज्य घटक बनते, हे आपल्याला कळतच नाही.
घटक चाचणी, सहामाही, वार्षिक परीक्षा.. असं काही वर्षे चालतच राहत..मग पुढे कोणत्या side ला जायचं science, commerce की arts.??? मग अमुक entrance आणि त्याप्रमाणे त्यांची तमुक सेमिस्टर्स वगैरे सुरू होतात.. graduation पर्यंत च जीव इतका मेटाकुटीला आलेला असतो, की अवघं आयुष्य म्हणजे फक्त शिक्षण आणि परीक्षा एवढंच आहे, असा विश्वास पक्का होतो. पण तो एक दिवस येतो की शिक्षण संपतं, हातात डिग्री पडते. तेव्हा “संपली एकदाची परीक्षा.. आता एखादी छान नोकरी नाहीतर व्यवसाय वगैरे करायचा यार”, अशी एक आनंददायी भावना आपल्या मनात घर करते. पुढे करिअर, लग्न, मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांच्या परीक्षा, त्यांचं करिअर, त्यांची. लग्न वगैरे हा प्रपंच चालणारच असतो. एवढ्या मोठ्या कालखंडात आपल्या परीक्षा खरं तर तेविशी चोविशी पर्यंत संपलेल्या असतात. पण विचार केला की प्रश्न पडतो की परीक्षा संपते का? की ती असतेच…. आणि अजून अवघड होत जाते. म्हणजे कसं की आधीच्या परीक्षां साठी विषय, तारीख, वेळ आणि जागा सुनिश्चित केलेली असायची… आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीतरी syllabus असायचा. सगळीच कल्पना असायची आपल्याला. नंतर असं काहीच नसतं. परीक्षा…कुठला विषय ,कोणती तारीख आणि वेळ ठरवून तुमची जागा तुम्हाला दाखवेल, याचा काही भरवसा नसतो. आधीच्या परीक्षेत मुभा असते एखाद दुसरा प्रश्न सोडून द्यायची. मात्र नंतर प्रत्येकच प्रश्न सोडवायचा असतो. नाहीतर पुढचा प्रश्न अधिक बिकट होतो. आधी कसं की प्रश्न म्हंटला की त्याचं उत्तरच असतं… कोणाचं छोटं तर कोणाचं मोठं. नंतर मात्र उत्तरं सुद्धा प्रश्न निर्माण करत असतात. आणखी एक गमतीदार फरक आहे. आधी कसं की पहिले शिक्षण आणि मग परीक्षा… नंतर मात्र परीक्षा आणि त्यातून शिक्षण.
थोडक्यात काय तर शिक्षण/परीक्षेची पद्धती फक्त काय ती बदलत राहते. पण कितीही नको असली तरी परीक्षा ही आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असते, हेच खरे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *